'पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला, घोटाळयाचे समर्थन करते'
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कश्मीरकडे दुर्लक्ष होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे डोळेझाक केल्यामुळेच पुलवामा हल्ला झाला, असे भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी सांगितले. यावरुन ठाकरे गटाने सामना संपादकीयमधून पंतप्रधान मोंदीवर शरसंधान साधले आहे. जम्मू-कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत व सत्य सांगितल्याबद्दल त्यांना ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’कडून लगेच निमंत्रण येऊ शकते, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे.
पुलवामा हल्ल्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदारपणाचा परिणाम होता. जम्मू-कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत व सत्य सांगितल्याबद्दल त्यांना ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’कडून लगेच निमंत्रण येऊ शकते. जसे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 40 जवानांच्या हत्येचे खापर ठरल्याप्रमाणे पाकिस्तानवर फोडून हे लोक गप्प बसले, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
सत्यपाल मलिक सांगतात, पुलवामामधील तो रस्ता प्रवासासाठी धोकादायक होता. सहसा त्या रस्त्याने सुरक्षाकर्मी प्रवास करीत नाहीत. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती, पण गृह मंत्रालयाने ही मागणी फेटाळली. जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती. त्याच रस्त्यावर आतंकी हल्ला होऊन 40 जवानांचे बलिदान झाले.
यानंतर मोदी यांनी कार्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना सुरक्षा त्रुटींची माहिती दिली. मला त्यांनी शांत बसण्यास सांगितले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला एकदम शांत राहण्यास सांगितले. सर्व खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि घटनेचा राजकीय फायदा उठविण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे मला समजून चुकले, असे म्हणत सत्यपाल मलिक यांनी जम्मू-कश्मीरमधील अनेक रहस्यांवरचा मुखवटा दूर केला असल्याचे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
पुलवामा प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी व भारतीय जवानांच्या अस्मितेशी निगडित होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी 40 जवानांना ‘हौतात्म्या’च्या नावाखाली पुलवामामध्ये वधस्तंभावर चढविण्यात आले. त्या शहीद जवानांची आक्रोश करणारी मुले, बायका, माता-पिता यांच्या अश्रूंचा वापर प्रचारात करून पुन्हा सत्ता मिळवली. इतक्या निर्घृण पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे. सत्तेच्या लोभाने भाजपास इतके मूकबधिर व अंध बनवले की, देशाच्या जवानांच्या जिवाचाच सौदा झाला.
सत्यपाल मलिक यांची जम्मू-कश्मीरच्या राज्यपालपदी नेमणूक पंतप्रधान मोदी यांनीच केली होती. त्यामुळे मलिक हे विरोधी पक्षांचे पोपट आहेत असे बोलून वेळ मारता येणार नाही. गौतम अदानींच्या कारनाम्यांवर पंतप्रधान चूप आहेत. पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावरदेखील ते चूप आहेत. अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्दय़ांवर पंतप्रधान ‘चूप’ असतात. मौनात जाणे पसंत करतात. पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला व घोटाळय़ाचे समर्थन करते, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.