सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, कोर्टाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकारण प्रचंड तापलेलं आहे, शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्याबाबत जोरदार वादंग पेटलेलं असतानाच नुकताच शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने शिंदे गटाला दणका देत शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आम्ही न्यायदेवतेचे आभारी आहोत. मी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते, या निर्णयानंतर आपण सर्व बघाल आता दसरा मेळाव्याला कसा जल्लोष होणार आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
५६ वर्षाची परंपरा अखंडित राहणार
पुढे त्या म्हणाल्या की, हा माझा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे आता मला दसरा मेळावा होणार म्ह्णून खूप आनंद होतो आहे. गेल्या ५६ वर्षाची परंपरा अखंडित राहणार, हा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. नेस्को येथील मेळाव्याचा ठसका दिल्लीपर्यंत पोहचला होता. शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. हा तर दसरा मेळावा भल्याभल्यांना झोमणारा देखील ठरणार आहे. असे विधान अंधारे यांनी यावेळी केले.
बाळासाहेबांचे शिवसैनिक नुसतं म्हणून चालत नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे खेळाडू वृत्तीचे आहे. शिवसैनिक महिलांचा आदर करतो रामदास कदम सारखं काही बोलत नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक लढाऊ आणि संघर्षशील आहे. सुरतला पळून जात नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक कूट कारस्थान करत नाही. खरी शिवसेना कोणाची हा विचार कोणाचा हे जनता जाणून आहे. अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर बोलताना घणाघात केला.