रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानानंतर सुषमा अंधारे आक्रमक; म्हणाल्या, बाईचा पदर...
मुंबई : राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या मुद्द्यावरून माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल, अशी टीका त्यांनी केली होती. या टीकेला आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.
रामदास कदम हे टिल्या आहेत. रामदास कदम यांच्या पाच पिढ्या पण काही करू शकत नाही. बाईचा पदर एवढा कमी वाटतो का यांना? तुम्हीही तुमच्या आईच्या पदराखाली कधी आला असाल? तुम्ही काय स्वतःला शिवरायांचे वारसदार सांगता, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. टीम देवेंद्र हे ठरवून राम कदम यांच्या मुखात शब्द घालतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून आमची एक पिढी गारद झाली. सगळ्या विद्यापीठाच्या ज्ञानशाखा वाढीस लागतात. त्या या विद्यापीठात देखील वाढायला लागतात. तसेच, सरकारी शाळेचा दर्जा सुधारत नाही. आणि मोदींच्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्या पैशांच्या खर्चात गरीब विद्यार्थ्याचे शिक्षण झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मागच्या काही दिवसात गलिच्छ राजकारण सुरू आहे. दैनंदिन प्रश्न यांच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांचा अवमान सुरु आहे. काही लोकांना तुमच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर व दररोजच्या प्रश्नांवर जाणून बुजून चर्चा करायची नाही. व्यवस्थेला बाहेरुन शिव्या घालून व्यवस्था बदलता येत नाही. ही लढाई माझ्या एकटीची नाही. सर्वांची आहे, असेही सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.