'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल; सुषमा अंधारेंकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त म्हणाल्या...
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय.
याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवला जातो आणि या चौथ्या स्तंभाने अत्यंत जबाबदारीने काम करायला हवं. एकीकडे गोदी मीडिया म्हणून काही माध्यमं बातम्या जाणीवपूर्वक लपवतात. अशा काळात काही माध्यमं जीवावर उदार होऊन काम करत राहतात आणि अशा पत्रकारांवर कायमच हल्ले होतात.
महाराष्ट्रात हे चित्र नाही असं वाटत होते. पण आता महाराष्ट्रातही असे हल्ले सुरु झाले आहेत. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही म्हणतात. ज्या पद्धतीने किरीट सोमैय्यांच्या व्हिडिओ संदर्भात मानहानीचा दावा दाखल झाला. जे सत्य आहे हे त्यांनी जशास तसे दाखवलं. ज्या मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याच मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ खरे असल्याचे म्हटले आहे. फडणवीस हे किरीट सोमैय्या यांच्या पक्षाचे आहेत.
किरिट सोमैय्या यांच्या पक्षाचे गृहमंत्री व्हिडिओ खरा आहे असे म्हणतात. ते खरं आहे ते सर्वांसमोर आहे हे माध्यमांचे काम आहे. तर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो आणि असा जर गुन्हा दाखल करायची तत्परता जर गृहखात्याकडे असेल तर आम्ही अब्रुनुकसानीच्या संदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनकडे गेलो. त्यावेळी फडणवीसांचे गृहखातं कानात बोळे घालून बसले होते का? याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.