बच्चू कडूंनी स्वाभिमान घाण ठेवला तरी...; सुषमा अंधारेंचा घणाघात
बालाजी सुरवासे | उस्मानाबाद : तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसला. यामध्ये बच्चू कडू यांनी अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली. अशातच भाजप समर्थित आमदार रवी राणा यांनीही खोक्यांचा आरोप केल्याने बच्चू कडू चांगलेच संतापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांना डिवचले आहे.
सुषमा अंधारे यांनी उस्मानाबादेत आ.कैलास पाटील यांच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या की, बच्चू कडू यांनी खूप काही केलं आहे. त्याची काहीच किंमत ठेवली गेला नाही. बच्चू कडूंचा विश्वासात झाला. त्यांनी खूप मेहनत घेतली होती. उपाशी राहीले दहशतीखाली राहीले. बच्चू कडू फार स्वाभिमानी माणूस आहे, पण प्रसंगी बच्चू कडू यांनी स्वाभिमानाशीही तडजोड केली आणि हिंदुत्ववादी स्वाभिमानी घाण ठेवला तर बच्चू कडूंना त्यांनी मंत्रिमडळात घ्यायला पाहिजे होती, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. यावरून अंधारे म्हणाल्या की, संजय शिरसाट यांनी काय अवस्था करून टाकली. इकडे राज्यमंत्री असलेला माणूस तिकडे काहीच देत नाहीत हे वाईट आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर टिका केली.
दरम्यान, रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील सरकार स्थापनेचे सत्ता नाट्य सर्वांनी बघितले. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराचे केले आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न कोणी करु नये. असे ते यावेळी म्हणाले. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले सात ते आठ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.