मध्यान्ह योजनेचे लाभार्थी खोटे, कोट्यवधी रुपये कुठे गेले; अंधारेंचा सरकारला प्रश्न
मुंबई : राज्यातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी सरकारची मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे एका वृत्तपत्राने समोर आणले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. अशातच, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या खर्चाची आकडेवारी मांडत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल खडसेंनी मध्यान्ह भोजनाबाबत मुद्दा मांडला. मध्यान्ह भोजनामध्ये कामगारांना जेवण दिले जातं. पण, असे लोक कमी आढळतात. जळगाव जिल्ह्याची माहिती आम्ही माहिती अधिकारातंर्गत मागवली. यात 35 ते 40 हजार मजुरांचा आकडा सांगण्यात आला. तर, याची सादर झालेली बिले आणि आलेली बिले याबाबतही माहिती मागवली होती. 14 ते 30 सप्टेंबरमध्ये फक्त 15 दिवसांचा खर्च 98 लाख 6477 रुपये एवढा आहे. तर, डिसेंबरमध्ये 3 कोटी 13 लाखापेक्षा जास्त आहे. जानेवारीमध्ये जवळपास 7 कोटीपर्यंत जाते. पहिल्या पाच महिन्याचे बिल त्यापेक्षा जास्त काढले. याचे नक्की लाभार्थी कोण आहे हे पण स्पष्ट झाले पाहिजे.
शिवभोजन थाळी 10 रुपयाला मिळते. तिकडे 67 रुपयांमध्ये काय जेवण मिळते? 35 ते 40 हजार लोकांचे जेवण कुठे नेतात हे माहित असले पाहिजे पण याबाबत कोणाकडे माहिती नाही. डब्बे सुद्धा अर्धवट भरलेले असतात एक गाडीमध्ये 300 ते 350 लोकांचे जेवण नेतात पण ते डब्बे अर्धेच असतात. असे अनेक व्हिडीओ आहेत ते दाखवले जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची यादीतील नावं आणि फोन नंबर असलेल्यांना आम्ही फोन केले. तर हे लोक आमच्याशी गुजराती भाषेत बोलू लागले. आम्ही कधी महाराष्ट्रात आलोच नाही, अशी उत्तरं त्यांनी आम्हाला दिली. तर, काही लोकांनी आम्ही कर्नाटकमध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे सगळे लाभार्थी खोटे असून योजनेवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठे गेले, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.