सीमावादावरुन संसदेत खडाजंगी! सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल; महाराष्ट्राविरोधात षडयंत्र...
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून पुन्हा चिघळला आहे. अशातच सोमवारी सीमाभागात काही मराठी भाषिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये राजकीय मंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याचे पडसाद आता देशाच्या संसदेतही उमटलेले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या प्रश्नावरून संसदेत खडाजंगी पाहायला मिळाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सुप्रिया सुळे यांनी भाजपावर घणाघात केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावे, अशी मागणी सुळेंनी लोकसभेत केली आहे.
सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, अशा घोषणाबाजीने संसद दणाणून सोडले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच, सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार? ही संसद आहे. हे अजिबात चालणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.