सुप्रिया सुळेंनी केली अजित पवारांची पाठराखण; म्हणाल्या...
अहमदनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरुन भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलने केली आहेत. तसेच, अजित पवारांनी माफी मागण्याची मागणीही करण्यात येत आहे. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असेल की पूर्ण ताकतीने सत्तेतील लोक उतरले. त्यांच्या पार्टीतील लोक काहीही बोलतात. तेव्हा, त्यांची पाठराखण करण्याचे पाप भाजप सरकार करते. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. अजित पवार यांचे वक्तव्य विरोधकांनी नीट ऐकावे. त्यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्रात चांगले-चांगले इतिहासकार आहेत. त्यांचे चर्चासत्र आपण आयोजित करू शकतो. इतिहास खूप महत्त्वाचा असतो तो पुढच्या पिढीला कळाला पाहिजे. हे तितकेच सत्य असून पुढच्या पिढीला जर महागाई वाढून नोकऱ्या मिळाल्या नाहीत, बेरोजगारी वाढली. तर ही पिढी करणार काय? केंद्र सरकार यावर काहीही बोलत नाही. केंद्र व राज्य सरकार हे महागाई व बेरोजगारीबद्दल रस्त्यावर उतरला असता तर ते जास्त संयुक्तीक झाले असतं, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.