काश्मीरला जाऊनही त्यांना अजित पवार आणि सुप्रिया सुळेच दिसतात; मुख्यमंत्र्यांवर निशाणा
विकास कोकरे | मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कुछ भी करेंगे खोके भी लेंगे पर खुर्ची बचायेंगे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत. यादरम्यान इंदापूर मधील न्हावी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपने पाच मंत्री हटवण्याची मागणी केली आहे. हे सर्व शिंदे गटाचे मंत्री आहेत इतके वर्ष मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काम केले ते केव्हाही अमित शहांकडे गेले नाहीत आणि कोणाला मंत्री बनवू हे विचारलं नाही. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. पण, मुख्यमंत्री कश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. तिथूनही ते आमच्यावर सुट्टी का करतायेत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
कश्मीरला जाऊनही त्यांना अजित पवार आणि सुप्रिया सुळे हेच दिसतात आमच्या दोघांबद्दल इतकं बोलतात की वर्षभराची एक टीव्ही सिरीयल काढू. मी असं बघणार मग दादा असं बघणार आणि मग म्युझिक येणार. मग पुढच्या भागात दादा ताईला काय बोलणार? एवढं बोलून पण दादा आणि मी काहीच बोलत नाही यांच्याच मनात खदखद असते.
बायकांना माहित असतं भावापेक्षा कोण प्रिय असतं, बहन का प्यार और भाई का आधार! पत्रकारांना सांगूनही कळत नाही. उगाच खडे टाकून बघतात. दहा वर्ष तेच बोलतात अजूनही तेच बोलतील. आपण फक्त मजा घ्यायची. मी तर सकाळीच दादाला सांगितले की आपण या लोकांकडून आता रॉयल्टी घेऊया, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.