सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा; ...तर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालू
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर होत्या या दरम्यान त्यांनी इंदापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंतर्गत चालणाऱ्या भिमाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी खोके सरकारकडे आमदार विकत घ्यायला पैसे आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाहीत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी इंदापुरात राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.
गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मिळणारे पोषण आहाराचे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झालं नसल्याने शाळा चालवणं कठीण झालं असून आम्ही ते बंद करण्याच्या विचारात असल्याचं गाऱ्हाणं संस्था चालकांनी सुळें समोर मांडताच सुळे यांनी राज्याचे मंत्री अतुल सावे सावे यांना तात्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
शिवाय, तुम्हाला मी ही शाळा बंद करून देणार नाही. तुम्ही त्यांचा आधार आहात. तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलं तर मुलं कुठे जाणार? महाराष्ट्र सरकार जर या आश्रम शाळेला बजेटचे पैसे देत नसेल तर तुमच्या या आश्रम शाळेसाठी मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर मी आंदोलनाला बसेल. पण पैसे मिळवून देणार, असे त्यांनी म्हंटले आहे.
बाकी सगळं थांबू शकतं पण आरोग्य आणि शिक्षण थांबू शकत नाही. या खोके सरकारकडे आमदार विकत घ्यायला पैसे आहेत. पण, या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. या सरकारचा मी जाहीर निषेध करते मी तुम्हाला शब्द देते की जर बजेटमधील हे पैसे असतील तर तर तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळवून देणारच, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
संविधानाच्या विरोधात कोण चुकीचं करत असेल तर त्या सरकारच्या विरोधात ताकतीने आपण लढलो पाहिजे. सगळी पोर मंत्रालयात त्या मुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन जाऊ आणि त्यांना घेराव घालू. ये नही चलेगा! त्यांच्याकडे मेट्रोला पैसे आहेत पण त्यांना अहिल्याबाईंच्या पोरांना शिक्षणासाठी द्यायला पैसे नाहीत, कसलं सरकार आहे हे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला.