केंद्रेकरांच्या स्वेच्छानिवृत्तीवरून दानवेंचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, त्यांना बळजबरीने...
छ.संभाजीनगर: राज्यातील काही मोजक्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले छ. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्यामुळे राजकीय मंडळींपासून ते सर्वसामान्या नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र, आता या स्वेच्छानिवृत्तीवरून राजकीय आरोप करण्यास देखील सुरूवात झाली आहे. यावरच बोलताना आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नेमका काय केला दानवेंनी आरोप?
सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर बोलताना दानवे म्हणाले की, सुनील केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचना केल्या. याच्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला, त्यामुळे केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. केंद्रेकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.