उद्धवजी पुन्हा एकदा विचार करा; मुनगंटीवारांची खुली ऑफर, अजूनही काही बिघडलंलं नाही
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यात भाजपशी युती तोडल्याने शिवसेनेवर टीका केली होती. याचवरुन भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा युतीबाबतीत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी मुनगंटीवार यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळे येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्याच्यामुळे त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती. या टिप्पणीवर उद्धव ठाकरेंनी खताऐवजी निरमा पावडर टाकली तुम्ही, असं म्हणाले.
यावर खतच होतं. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला. आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड जाळणारं होतं ते टाकलं. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा, असा सूचक सल्ला मुनगंटीवारांनी दिला. यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.