Ambadas Danve: 'सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक', विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
सोमवारी विधानपरिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्ष नेत्याला आपली एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या आवाज दडपण्याचा प्रकार आहे,अशी टीकाही त्यांनी केली. कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सभापती यांनी विधीमंडळ सभागृहात ठराव व चर्चा न घेता ठरवून पक्षपातीपणे निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपकडे असलेल्या पाशवी बहुमतावर विरोधी पक्षनेते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकप्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
यापूर्वीही केंद्रात 150 खासदारांचे निलंबन करून भाजपने आपण लोकशाही किती मानतो हे दाखवून दिले आहे. सभागृहात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे, ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. त्याबाबत मी आज सभागृहात दिलगिरी व्यक्त करणार होतो. मात्र आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला माझी भूमिका मांडू दिली नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.