न्यायालयाचा हा निकाल आमच्यासाठी 'मोठा विजय' खासदार श्रीकांत शिंदेंचे विधान
राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना, आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. या निकालानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ‘आमच्यासाठी मोठा विजय आणि समोरच्यांसाठी ‘आय ओपनर’ असा हा निकाल आहे. असं माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
खासदार शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने वेळ दिला होता. त्यातून न्यायालयाचाही मान राखण्यात आला हेाता. सर्वोच्च न्यायालयाने आता आपला अंतिम निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही स्वतंत्र आहे, कारण ती संस्था स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे ते यावेळी म्हणाले.
श्रीकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात गेले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींसाठी गेले नाही पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टी आपण कोर्टात जाऊ लागलो, तर याच बाबींच्या केसेस कोर्टात उभ्या राहतील. महत्वाचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतील. यापुढे कोर्टात जाताना त्यांनी विचारपूर्वक गेले पाहिजे. अशी जोरदार टीका यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.