Shrikant Shinde: 'उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू' भाजप- शिवसेना वादावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
मयुरेश जाधव|कल्याण: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा रंगली. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे असल्याचा दावा करण्यात आला होता. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजपा-शिंदे गटाच्या युतीवर सडकून टीका करण्यात आली. यावरच आता खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय दिले श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर?
विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना खासदार शिंदे म्हणाले की, 'खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे. असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले.
पुढे ते म्हणाले की, कार्यकर्ते कायम उत्सूक असतात. ते त्यांच्या स्तरावर काही ना काही करत असतात. तो दोन्हीकडील कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा असतो. वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. अनेक भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. ते सर्व एकत्रच झाले. उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप त्यांनी केला.