श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : जे काही केले ते रागाच्या भरात; न्यायालयात आफताबची कबुली
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्यांकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले. यावेळी आफताबने न्यायालयासमोर हत्येची कबुली दिली आहे. जे झाले ते रागाच्या भरात झाले, असे त्याने न्यायालयात म्हंटले आहे. दरम्यान, न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
आफताब पुनावालाची पोलीस कोठडी आज संपणार होती. यानुसार आज विशेष सुनावणी अंतर्गत आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान आफताबने न्यायाधीशांसमोर सांगितले की, जे काही आरोप लावले जात आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. माझ्याकडून जे काही केले गेले ते रागाच्या भरात केले गेले. तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे आफताबने न्यायालयाला सांगितले. बरेच दिवस झाल्याने अनेक गोष्टी आठवत नाहीत, असेही आफताबने न्यायालयात सांगितले आहे. यानंतर न्यायालयाने आफताबला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दिल्ली पोलिसांच्या मागणीवरून साकेत न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आफताबने ज्या जंगलात मृतदेहाचे तुकडे फेकले होते, त्या जंगलात पोलीस आता पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार आहेत. आफताब सातत्याने तपास भटकविण्याचा प्रयत्न करत आहे. तो सतत आपली विधाने बदलत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे, शस्त्रे आणि श्रध्दाच्या मोबाईलबाबत त्याने अनेकदा आपली विधाने बदलली आहेत, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
आफताब पूनावालाची सोमवारी नार्को टेस्ट होणार होती. मात्र, होऊ शकली नाही. परंतु, नार्को चाचणीपूर्वी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करावी लागते. याआधी गुरुवारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना ५ दिवसांत आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी दिल्ली पोलिसांनी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. आफताबनेही त्याला संमती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र त्याने फेकल्याची जागा सांगितली होती. परंतु,पोलिसांनी दोनदा त्या झुडपांची तपासणी केली. मात्र, अद्यापही या घटनेतील शस्त्रे सापडलेली नाहीत. श्रद्धाच्या डोक्याचा एक भागही सापडलेला नाही. फक्त काही हाडे आणि जबड्याचा काही भाग सापडला आहे. या घटनेतील कपडेही पोलिसांनी जप्त केलेले नाहीत. पोलीस श्रद्धाचा फोन शोधण्यात गुंतले आहेत.