हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटकेंचा आहे : ऋतुजा लटके
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. यामुळे शिवसेनेची विजयी मशाल पेटली असून राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष सुरु आहे. यावेळी ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली. हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्दीत जनसेवा व विकासकामे केली. त्याची ही पोचपावती आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या साथ दिल्यामुळे मी जिंकले आहे. आता मातोश्रीवर जाणार आहे. मला उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. हा विजय त्यांचा आहे, त्यांचे मी आभार मानते.
नोटाला अधिक मते मिळाल्यावर लटके म्हणाल्या, त्यांनी उमेदवारी जरी मागे घेतली तरीही त्यांनी नोटा साठी मतदान करण्यासाठी प्रचार केला होता. आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत. नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?
हा जल्लोष मी साजरा करणार नाही. ही पोटनिवडणूक आहे. माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मी माझ्या पतीच्या जागेवर ही निवडणूक लढवली आहे. आम्हाला नवं पक्षचिन्ह मिळालं, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. त्याचा जल्लोष होईल. पण मला एक खंत आहे. पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.