बोम्मई यांच्यावर महाराष्ट्रात खटला दाखल करून दाखवा, का म्हणाले संजय राऊत असे?
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने जुंपलेली पाहायला मिळत आहे. याच गोंधळा दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद चालू असताना हिवाळी अधिवेशनादरम्यान दिशा सालियन प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांच्यावर सरकारकडून गंभीर आरोप लावण्यात येत आहे. त्यावरूनच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला आव्हान दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर महाराष्ट्रात खटला दाखल करून दाखवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश धुळकावून बोम्मई सीमावाद पेटवत आहेत. तुम्ही याची एसआयटी लावता. त्याची एसआयटी लावता. त्याची चौकशी करता. त्याला क्लीनचीट देतात. उद्या तुम्ही बोम्मईंनाही क्लीनचीट द्याल. आमची इच्छा सर्वकाही करण्याची आहे. पण, सरकारमध्ये हिंमत आहे का. आमची भाषा घुसण्याची आहे. ती भाषा आम्ही केली आहे. या सरकारला शेपट्या फुटल्या आहेत. रोज एक शेपटी आतमध्ये घालतात. २० लाख मराठी बांधव अन्यायग्रस्त आहेत. निदान त्यांच्या बाबतीत तरी महाराष्ट्राशी इमान राखा, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राज्य सरकारनं क्लीनचीटचा कारखाना उघडला आहे. कुणा-कुणाला मिळाली मला माहीत नाही. उद्या बोम्मई यांनाही क्लीनचीट मिळेल. उद्या पाकिस्तानात राहून दाऊत इब्राहीम यांनी भाजपात प्रवेश केला, तर त्यांनाही क्लीनचीट मिळेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. विरोधकांना गुन्हेगार ठरविलं जाऊ शकतं. हा क्लीनचीटचा कारखाना आणि दिलासा घोटाळा आहे. या सुत्रीवर हे राज्य चाललंय, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.