तब्बल सव्वा दोन तासानंतर देशमुखांची एसीबीकडून चौकशी संपली
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना त्यातच सत्तांतराच्यावेळी शिंदे गटातील आमदारांसोबत गेलेले. परंतु, गुवाहाटीला न जाता सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख यांची एसीबीकडून बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी आज चौकशी झाली. तब्बल सव्वा दोन तास एसीबीकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता एसीबीकडून देशमुखांची चौकशी पूर्ण झाली आहे.
चौकशी आधी देशमुखांकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे रवाना झाले. अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती येथे रवाना झाले होते. आपल्याला अटक होईल या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना औक्षण घातले असून कपडे आणि सामानही सोबत घेतले होते.
नेमकं काय आहे प्रकरण ?
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरुद्ध अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली होती. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करीत अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.