आमची मशाल गद्दारांचे खोके साफ, संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आता शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे. 'एक फुल दोन फाप' असं म्हणत शिंदे गटात गेलेल्या बुलडाण्यातील खासदार आणि आमदारांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
काय म्हणाले राऊत?
बुलढाण्यात शेतकरी मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले की, ''शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी १०० दिवस काय जन्मठेप भोगायला देखील तयार आहे, महाराष्ट्राचा इतिहास हा लढवय्या आहे, त्यामुळे हे ४० रेडे महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना जाब विचारा. शिवसेनेचे चिन्ह काय आहे मशाल. आमची मशाल गद्दारांचे खोके साफ केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी घणाघाती टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ''सगळ्यात जास्त खोके हे बुलडाण्यात आले आहेत. त्यामुळे हे खोक्यावाले पुन्हा निवडून जाणार नाही याची शपथ आपण घेतली पाहिजे. हेच खोकेवाले आज गुवाहाटीला गेलेत. पण महाराष्ट्रातील देव काय संपले आहेत का?, राज्यातील बेकायदेशीर सरकार सत्तेत बसलंय, पण हे सरकार एक दिवस जाईल. महाराष्ट्राचा इतिहास हा लढवय्या आहे, त्यामुळे हे ४० रेडे महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना जाब विचारा'', ''सर्वात मोठे देव आणि मंदिर हे बुलडाण्यात आहे. पण खोक्यावाले रेडे गुवाहाटीला गेले आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. ज्या पक्षाने देशाला नेतृत्व दिलं त्यासाठी मी कुरबान व्हायला देखील तयार आहे. मी तुरूगांत गेलो तरी भगवा माझ्या सोबत होता, आणि या पुढे राहिल. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून या रेड्याचा बळी आपण दिला पाहिजे'', असं संजय राऊत म्हणाले.