'आम्ही दूर करू' पवारांवर केलेल्या टीकेनंतर आंबेडकरांना राऊतांचा सल्ला
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नुकताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. परंतु, वंचितने महाविकास आघाडीसोबतच्या युतीबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट केले नाही. या दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याच वादादरम्यान, आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी आंबेडकरांना सल्ला दिला आहे.
काय दिला राऊतांनी सल्ला?
शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर सल्ला देताना संजय राऊत म्हणाले की, त्यांचे मतभेद असतील पण त्यांनी अशी वक्तव्य करू नये, मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. भविष्यात आम्ही एकत्र बसून त्यांच्यात काय मतभेद असतील तर ते आम्ही दूर करू. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या संभांवर अशी वक्तव्य करू नये, असे राऊत यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असे ते म्हणाले होते.