'हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही' शिंदे गटावर राऊतांचा घणाघात
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जयंतीवरून चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच जयंतीनिमित्त आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. याच मेळाव्यात बोलत असताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले राऊत?
शिवसेना अभेद्य आहे. दुसरी शिवसेना निर्माण नाही होणार. आपण पुरून ऊरू त्यांना. पक्ष असा चोरता नाही येणार. देवाची मुर्ती चोरणारा तो मुर्ती विकतो. हे मुर्तीचोर आहेत. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येते व जाते. त्याचे अस्तित्वही दिसत नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. आज चौथे चाक लागलंय. दोन स्टेफनीही तयार आहेत. आम्ही दगडच, हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शिवसेना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. शिंदे-मिंधे काही नाही. असे देखील राऊत यावेळी म्हणाले.
अरे तुम्ही येथे हो आम्ही इथे, किती खोके देऊ तुम्हाला?
आपल्या देशाच्या राजकारणात फार गंमतीजमती होत असतात मुख्यमंत्री दावोसला गेले, आपल्याला माहिती नाही ते दावोस कुठंय? आपल्याला दापोली माहिती आहे दावोसला तिथे महाराष्ट्रात गुंतवणीकीचं कार्यालय केलं तिथे आपले मुख्यमंत्री बसले होते. तिथे दोन-चार लोक अचानक आले. हे गडबडले, बोलायचं काय? विचारात पडले तिथल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले, अरे तुम्ही येथे हो आम्ही इथे, किती खोके देऊ तुम्हाला? येता आमच्या पक्षात येता? ते म्हणतात, नाही मला खोके नको, आम्ही मोदीचे माणसं आहोत. तुम्हीपण मोदीचे माणसं आहात. आम्हीपण मोदीचे माणसं आहोत. बरं झालं. मग त्यांनी एक सेल्फी काढला. फोटो काढा आणि मोदींना दाखवा. असा टोला देखील यावेळी त्यांनी शिंदेंना दिला.