बीबीसी न्युजवरील छापेमारीनंतर राऊत संतापले; म्हणाले, अघोरी कृत्य...
बीबीसी न्युजच्या दिल्लीतल्या कार्यालयावर आज प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे विरोधीपक्ष सरकारविरुद्ध चांगलेच आक्रमक झाला आहे. भाजपवर सर्वच स्तरावरून टीका होत असताना आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी देखील याकारवाईवरून मोदीसरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
देशात लोकशाही संपत चाललीय- संजय राऊत
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारले जातात, पंतप्रधानांना प्रश्न विचारले जातात. तेव्हा अशा प्रकारच्या धाडी पडतात. किंवा अटक केली जाते याचे आम्ही जिवंत उदाहरण आहोत. या देशात लोकशाही संपत चालली आहे. असे विधान त्यांनी यावेळी केले.
पुढे ते म्हणाले की, याआधी वृत्तपत्रावर या प्रकारचे वर्तन घडलेले माझ्यातरी लक्षात नाही. न्यायपालिका आणि वृत्तपत्र यांचा गळा घोटण्याचे काम सध्या सुरु आहे. राहुल गांधींनी लोकसभेत प्रश्न विचारले तेव्हा त्यांना नोटीस दिली. बीबीसीने डॉक्युमेंट्री केली त्यांच्यावर धाडी टाकली. देशात लोकशाही तुम्ही उत्तर द्या ना. तुमचं पण ऐकलं जाईल, तुम्ही तर अनेक माध्यमांचे मालक आहेत. अदानींनी तुमच्यासाठी माध्यम घेऊन ठेवली. या सरकारचा कार्यकाळ सोडला तर वृत्तपत्रांबाबत असे अघोरी कृत कोणत्याच सरकारमध्ये झाले नाही. अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.