शाहंसोबतच्या भेटीत झालं काय, मुख्यमंत्री फक्त कॉफी पिऊन निघून आले का?, खैरेंचा सवाल
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. हा सर्व वाद सुरु असताना महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रचंड उफाळला होता. या वादावरून गदारोळ सुरु असताना दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर देखील हा वाद शांत झालेल्या नाहीय, त्यावरूनच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले खैरे?
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता बेळगावात जायचं ठरवलं आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून नेते आणि कार्यकर्त्यांची अडवणूक सुरु आहे. कर्नाटकने आम्हाला अडवण्याचं काम नाही. महाष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आह. केंद्रातदेखील भाजप सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज होती. मात्र शिंदे आणि फडणवीस यांनी या भेटीत काय घडलं ते बाहेर येऊच दिलं नाही. मग हे धडाडीचे मुख्यमंत्री फक्त कॉफी पिऊन निघून आले का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, बेळगाव-कारवार निपाणी बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी आमची मागणी होती. पण आता सोलापूर आणि सांगलीतल्या गावांवरही त्यांनी दावा कर्नाटकने सांगितलाय. हा वाद मुद्दाम उकरून काढला जात आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकार भाजपचं सरकार असताना हा मुद्दा वाढवला जातोय. तिघांच्या बैठका झाल्या, पण त्यात काही बाहेर आलं नाही, त्यामुळे तिथे काहीतरी घडलं असेल, अशी शंका खैरे यांनी व्यक्त केली आहे.