जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत - आदित्य ठाकरे
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरून जोरदार जुंपलेली असते. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचं आज उद्घाटन झालं. त्या ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शरद पवारांनी काही दिवसांपुर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर काल त्यांनी तो निर्णय मागे घेतला. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील. आता ज्या काही बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. त्यापूर्वी विधान परिषद असेल, यामध्ये महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं आहे आणि मिळणार आहे त्यामुळे राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुका होऊ देत नाहीयेत. त्यामुळे आता संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे, अस बोलत त्यांनी सरकारवर टीका केली.
पुढे त्यांनी बारसू रिफायनरीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, आव्हानाला आम्ही जास्त महत्व देत नाही. सभेला परवानगी नाकारणे ही जशी हुकूमशाही दादागिरी हे घटनाबाह्य सरकार तिथल्या नागरिकांवर करते, ती आमच्यावरही दाखवत आहेत. मुळात प्रश्न हाच राहतो की इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? पालघरमध्ये आदिवासी महिलांना घराबाहेर काढलं गेलं. बारसूमध्ये असं होतंय. अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला आता दिसते. ही राजवट हुकूमशाहीची आहे, असे ते म्हणाले.