सरकार मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहे, आदित्य ठाकरेंचा पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार निशाणा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप होत आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे- फडणवीस सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत. अश्या शब्दात त्यांनी राज्यसरकार टीका केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मोगलाई असल्याची स्थिती आहे. गणेशोत्सवात गोळीबार करणाऱ्या आमदारांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. गद्दार आमदारांकडून कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात अनेक घटना घडल्या आहेत. शिवीगाळ, धमक्या देणं, दादागिरी अशा घटना घडत आहेत. मात्र, कारवाई झालेली नाही. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके या धोरणावर सरकार चाललं आहे. असे टीकास्त्र त्यांनी यावेळी शिंदे- फडणवीस सरकारवर सोडले.
खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत. मुंबईतल्या इंचा इंचाची यांना पडलेली नाही. या खोके सरकारला स्क्वेअरफुटांची चिंता आहे. अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, मुंबईत कामं करण्याचा करण्याचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याच्या आधी पूर्ण केली जातात. मात्र आत्ता हाती घेतलेली काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण होतील का? याचा अभ्यास केला गेलेला नाही. तसंच या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे. महापालिकेत कोणतीही बॉडी नसताना महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली हा प्रश्न मुख्य आहे. जी टेंडरची खिरापत वाटण्यात आली आहे त्या टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही टेंडर्स काढण्यात आली असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.