कोणेही यावे आणि आमची भाजी करावी, ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं लोकार्पण आणि समृद्धी महामार्गाचंही लोकार्पण होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने आता साऱ्या राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहेत. त्यावरच बोलताना शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. त्यामुळे उद्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचे प्रयत्न करतील. शिवाजी महाराज की जय म्हणतील. मग आम्हाला टोमणे मारतील की, बाळासाहेब ठाकरे कसे होते. पण माझी त्यांना एक विनंती आहे की, तुम्ही देशाचे पालक असून पालकांसारखं बोलावे. महाराष्ट्र पालकाची भाजी आहे असे समजून बोलू नका, कोणेही यावे आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही मिंदे नाही असेही ठाकरे म्हणाले आहे.