शिवरायांचा अपमान करणारे पंतप्रधान मोदींसोबत एका व्यासपीठावर याचा अर्थ काय? ठाकरेंचा सवाल
सध्या राज्यात एकच राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. पण ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आंबेडकरी चळवळीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेगटात प्रवेश केला. त्याच वेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद बोलताना राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त विधानाचा पुन्हा समाचार घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. त्यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल देखील उपस्थित होते. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर पाहायला मिळते. याचा अर्थ काय? महाराष्ट्रानं याचा काय अर्थ घ्यायचा?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे. त्यावर कुणी बोलत नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखी वक्तव्य करत आहेत. त्यावर आमचे मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. त्याची भूमिका काय? हे त्यांनी स्पष्ट करायला हवं”, असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केलीय.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या 701 कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गाचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.