...तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरेल; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. आता याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी आज राज्यभरातील जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग व शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे?
चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ दुर्देवाने देशात सुरु झाला आहे. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. मी भाग्यवान आहे की बाळासाहेब आणि मॉंसाहेबांच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
माझ्या पक्षावर जी वेळ आली ती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर येऊ शकते. आताच मुकाबला केला नाही तर आगामी 2024 ची निवडणूक अखेरची ठरेल. त्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो. आम्ही हिंदुत्व सोडले नाही आणि सोडणारही नाही. पण, हिंदुत्वावादचा बुरखा घालून जर कोणी राष्ट्र गिळायला निघाले असेल तर एक कडवट सच्चा राष्ट्रीय हिंदुत्व जपणाऱ्यांनी एकत्र यायला हवंय. असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.