नारायण राणेंनंतर आता शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा जरांगेंच्या त्या मागणीला विरोध
मुंबई: मागील एक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. तर दुसरीकडे ते राज्यात ठिकठिकाणी जाऊन जाहीरसभा घेत आहेत. दरम्यान आता या विषयावरून राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केला असून त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील कुणबी प्रमाणपत्राला विरोध केला आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीला माझी मान्यता नाही. मी त्यांच्या विरोधातला आहे. कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो, असे विधान त्यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, मला माहीत आहे, विदर्भात कुणबी आणि मराठ्यात सर्व व्यवहार चालतात. पण कोकणात कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार चालत नाही, याची कल्पना मनोज जरांगेंना नाही. त्यांचा सर्व महाराष्ट्राचा आणि कोकणाचा तेवढा अभ्यास नाही. असे ते जरांगेंबाबत म्हणाले.