अयोध्या पौळ शाईफेक प्रकरणावर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया; म्हणाले, पौळ यांनी खरे सांगावे...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युध्द होत आहे. याच वादादरम्यान शुक्रवारी ठाण्यात एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. शिवसेना ( ठाकरे गट ) सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ असे त्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावरच आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नरेश म्हस्के?
अयोध्या पौळ यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, 'अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक होत असतानाची व्हिडीओ क्लिप पाहा. शाईफेक होत असताना अयोध्या पौळ या हसत आहे. त्यामुळे नक्की शाई फेक करण्यात आली की करून घेतली,' असा सवाल त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, 'एका कार्यक्रमात अयोध्या पौळ यांना बोलावण्यात आले होते. तिथे महापुरूषांच्या फोटोला हार घालण्यावरून भांडण झाले. त्यानंतर केलेल्या भाषणाच्या रागातून शाईफेकीचा प्रकार झाला. पण, कोणीही काहीही केले तर आमच्यावर नाव घेतले जाते.' असे ते म्हंटले. निमंत्रण कोणी दिले हे माहिती नसताना आरोप करणं चुकीचे आहे. जे काही झाले, ते अयोध्या पौळ यांनी खरे सांगावे, असे नरेश म्हस्के म्हणाले.