धनुष्यबाण गोठवलं! निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेची दिल्ली हायकोर्टात धाव
मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं. यामुळे उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही. याविरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहेत.
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फुट पडली. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत घरोबा करत मुख्यमंत्री पदी विराजमान झाले व शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. यासाठी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठविले आहे. याविरोधात आता शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. व लवकरात लवकार निर्णय घेण्याची विनंती केली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकून घेतली नसल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे. तर, आजच चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगातही सुनावणी होणार आहे. याआधीच न्यायालय शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी करणार का, याकडे सर्वांचेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही गटांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही आपापल्या पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहेत. आयोग त्यांना दोन्ही गटांनी सुचविलेले नाव आणि निवडणूक चिन्हे वापरण्याची परवानगी देईल. यानुसार ठाकरे गटाने नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी पसंती असल्याचे समजत आहे. तर, चिन्हासाठी प्रथम त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन चिन्ह सुचविले आहेत. परंतु, ही तिन्हीही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत.