शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाच्या सुनावणीला 'सुप्रीम' स्थगिती
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे शिंदे सरकारला धक्का बसला आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं चार आठवड्यांचा वेळ मागितला होता.
पण, आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला होता. याची मुदत आज संपली असून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती. परंतु, सर्वोच्च न्यायालायाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही दोन दिवसांची स्थगिती दिली आहे. तर, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर दोन दिवसानंतर म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. सुनावणीदरम्यान, पक्षचिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अंतिम असेल, असेही स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे,
काय आहे प्रकरण?
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रलंबित प्रकरण निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली होती.