'शेतकऱ्यांनी गाव विकायला काढली, हे राज्यपालांना माहितीयं का?'
मुंबई : शिवसेनेने (ठाकरे गट) आज 'सामना'मधून राज्य सरकारवर टीका केली आहे. गारखेडा गाव विकणे आहे, अशी गावकऱ्यांनी घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी गाव विकायला काढली, राज्यपाल आहेत कुठे? असा सवालच सामनातून विचारण्यात आला आहे. सरकार स्नेहभोजनात व्यस्त, शेतकरी उपाशी, असे टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात. महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱ्यांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱयांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय शेतकरी राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि शिवसेनेचे लोकही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो, असेही शिवसेनेने विचारले आहे.
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळय़ा सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते. शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? त्यांचे ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते, असा टोला राज्यपालांना लगावला आहे.
सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या ‘डॉक्टरेट’ पदव्यांच्या चौकशींचे आदेश तरी त्यांनी द्यावेत. एकंदरीत राज्यपाल या दिवाळीत कोणतेही लवंगी फटाके फोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. महाराष्ट्राचा शेतकरी महाप्रलयात गटांगळय़ा खातो आहे. त्याची पिके वाहून गेली. त्याला सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र राज्यपालांनी शेतकऱयांच्या या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱ्यांचे सरकार सत्तेवर आहे? राज्यपालांची ही दिवाळी तशी थंडच दिसते.
‘सेनगाव तालुक्यातील (जि. हिंगोली) गारखेडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पत्र पाठवून चक्क आपले गावच विक्रीस काढले आहे. गावविक्रीचा तसा फलक त्यांनी गावात लावला आहे! ही तर सुरुवात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन शेतकऱयांचे हे गाव विकत घेईल काय, असा प्रश्नही शिवसेनेने शेवटी विचारला आहे.