'अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

'अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

मोदी सराकारला अच्छे दिनाच्या आश्वासनांची आठवण करुन देत शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे.
Published on

मुंबई : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पीक मातीमोल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तर, सर्वच स्तरावरुन ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सराकारला अच्छे दिनाच्या आश्वासनांची आठवण करुन देत शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे.

पेंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे.

सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? हा प्रश्न कायमच आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदीचे सावट, बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून आणि हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशकिरणांची थोडीशी तरी तिरीप टाकायलाच हवी. अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com