Shivsena : 'नाच्यांना सुरक्षा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय ‘वाय झेड’ करणारा'
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह 41 आमदारांनी बंड पुकारला आहे. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरला आहे. अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात हल्ले केले आहेत. यामुळे या आमदारांना केंद्राची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णायावर शिवसेनेचे मुखपत्र सामानामधून सडकून टीका करण्यात आली आहे.
राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना ‘वाय’पासून ‘झेड’पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे. देशभरात अशा ‘वाय’वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार ‘नाच्यां’ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, अशा शब्दांत शिवसेनेने बंडखोर आमादारांवर टीका केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना CRPF सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर, शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोच्च न्यायलायात सुरुवात होणार आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार असून दोन्ही पक्षांकडून यासंदर्भातील तयारी सुरु झाली आहे.