'शिवसेना फोडण्याचेच भाजपचे मिशन होते, पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले'
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाल्याचा आनंद भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते. पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. या विधानाचा समाचार आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून घेण्यात आला आहे. गिरीश महाजनांनी भाजपचा दावा खोटा ठरवला. भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते. शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले, असा दावा शिवसेनेने केला आहे.
गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर शिंदे यांनी टाळय़ा वाजवल्या व खुशीने दाढीवर हात फिरवला. शिंदे यांनी एक प्रकारे महाजन यांच्या विधानाचे समर्थन केले. महाजन यांच्या विधाने महत्त्वाची आहेत. पहिले म्हणजे, शिवसेनेतून जे चाळीसेक लोक फुटले ते कोणत्याही उदात्त हेतूने फुटले नाहीत. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडले वगैरे सांगून जे आपल्या बेइमानीचे समर्थन करीत आहेत ती बकवास आहे. येथे हिंदुत्व वगैरे गोष्टीचा काहीच संबंध नाही. हे महाजन यांनीच स्पष्ट केले. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फुटली. शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. त्याची हवाच महाजन यांनी काढली, असे शिवसेनेने म्हंटले आहे.
चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला आहे. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला. भाजपला महाराष्ट्र फोडायचा आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत व ते मिशन साध्य करायचे तर मग आधी शिवसेना फोडावी लागेल. शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र कमजोर करता येणार नाही याची खात्री असल्यानेच महाजन म्हणतात त्याप्रमाणे, शिवसेना फोडण्याचे ‘मिशन’ भाजपने पूर्ण केले.
शिवसेना फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या अंधारात वेश पालटून बाहेर पडत व शिवसेनेच्या फुटीर आमदारांना भेटून सौदेबाजी करीत. फडणवीस यांच्या या ‘हरुन अल रशीद’ प्रकरणाचा गौप्यस्फोट खुद्द अमृता फडणवीस यांनीच केला! शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली, असा निशाणा शिवसेनेने भाजपवर साधला.