किती जणांना आत टाकाल? तुरुंग कमी पडतील; राऊतांच्या अटकेनंतर सामनातून हल्लाबोल
महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू आहेत. अर्थात महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
संसदेचे अधिवेशन व उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होईपर्यंत सवलत मिळावी व त्यानंतर मी चौकशीसाठी हजर राहीन, असे पत्र राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता रविवारी पहाटे ‘ईडी’ची पथके राऊत यांच्या घरात घुसली व त्यांना ताब्यात घेतले ही तर तपास यंत्रणांची झुंडशाही व दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे शेवटचे टोक आहे. राज्यकर्त्यांनी असे ठरवले आहे की, सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिराजींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो. आज आपल्या देशात नेमके काय चालले आहे, असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना 17 तास चौकशीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने कोर्टात हजर केलं होतं. संजय राऊत यांच्यावतीने अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली. संजय राऊत यांच्यावर जाणीवपूर्वक पद्धतीनं कारवाई केली जातेय, राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर ही कारवाई होतेय, असं राऊतांचे वकील म्हणाले होते.