शिवसेना विधीमंडळ कार्यालयावर शिंदे गटाने घेतला ताबा
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने आता आपला मोर्चा शिवसेना कार्यालयाकडे वळवला आहे. यानुसार आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे.
धनुष्यबाण आणि शिवसेना हे मुळ नाव शिंदे गटाला भेटल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील हालचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक झाली. यानंतर विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार विधानभवनात दाखल झाले व विधिमंडळातील कार्यालय ताब्यात देण्याची मागणी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांना केली आहे. यानंतर भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यापुढे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट कोणती नवी खेळी करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
दरम्यान, पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट टप्प्याटप्प्याने राज्यतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकते. याचा प्रयत्नही दापोली व नेरुळमध्ये करण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही गटात संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.