sushma andhare
sushma andhare Team Lokshahi

शिंदे-भाजपमध्ये आलबेल नाही, 2023 ला मध्यावधी : सुषमा अंधारे

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे गटाला सोडले टीकास्त्र
Published on

मुंबई : शिंदे गटात आणि भाजपात धुसफूस सुरु असल्याचा दावा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागणारच, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असून भाजपा आणि शिंदे गटाचे नाही. फडणवीसांना विनयभंगाची व्याख्या शिकवण्याची गरज आहे का, असेही त्यांनी सुनावले आहे.

sushma andhare
विनायक मेटे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; कारचालकावर गुन्हा दाखल

सुषमा अंधारे म्हणाले की, 2023 ला मध्यवती लागतील. कारण भाजप व शिंदे गटात धुसफुस सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना स्पेस दिला जातो यातून खदखद सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग नाराज आहे याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहे. शिंदे गटातही मंत्री पदाची आमिषे पूर्ण होत नाहीत. संजय शिरसाट नाराज आहेत. तसेच इतरही नाराज आहेत.

भाजप सूडबुद्धीने राजकारण खेळत आहे. भाजप शिंदे गटाला संपवण्याचे धोरण सुरू केले आहे. सेनेच्या मतदारसंघावर भाजप हक्क सांगत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातही शिरकाव सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची जाणीवपूर्वक इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न टीम फडणवीस करत आहे. मराठा नेतृत्व दिले पण त्यांना बुद्धांक नाही हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्वक्षमता नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप अंधारेंनी केला आहे.

sushma andhare
हातातले खंजीर आधी बाजूला ठेवा अन् मग बाळासाहेबांना अभिवादन करा; राऊतांचा टोला

उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार होती. पण ती रद्द झाली आहे. वंचितकडून युतीचा अजिबात प्रस्ताव नाही. शिंदे गटाचे कोणी परत आले तर त्यांच्यासाठी आम्ही दोर कापलेले नाहीत, असेही सुषमा अंधारेंनी सांगितले आहे.

15-20 वर्षाचा व्हिडिओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुसंकृतपणा आहे, असे म्हणत अंधारेंनी मनसेवर निशाणा साधला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, मी शिवबंधन सोडते आणि किरीट सोमय्यांचा दोरा बांधते. मी त्यांना एवढेच विचारते की, अनिल परब यांचा बंगला दूर आहे. पण, नारायण राणेंच्या बंगल्यावर कोर्टाने आदेश देऊनही कारवाई का होत नाही, बीकेसीच्या मेळाव्याला पैसा कोठून आला, भावना गवळीना कोणते वॉशिंग मशीन वापरले, अशा प्रश्नांची सरबत्तीच सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे. फडणवीस तुम्ही भाजपा आणि शिंदे गटाचे गृहमंत्री नाही. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, असेही त्यांनी सुनावले आहे.

जितेंद्र आव्हाड प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांची चांगलीच कानउघडणी केली आहे. अंबाबाई मंदिरात पुजारी ताई सरका म्हणून पुढे ढकलतो तर त्याला विनयभंग म्हणणार का? कंडक्टर महिलांना पुढे सरका म्हणतात त्याला विनयभंग म्हणणार का? देवेंद्र फडणवीसांना विनयभंगाची व्याख्या शिकवण्याची गरज आहे का, अशी टीका त्यांनी केली आहे.

sushma andhare
श्रध्दा वालकर प्रकरणातील आरोपीला भरचौकात फासावर लटकवले पाहिजे : संजय राऊत

भाजप-शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्यावर भेटत नसल्याचा सतत आरोप केला जात आहे. या आरोपाचा समाचारही अंधारेंनी यावेळी घेतला. अडीच वर्षे उद्धव ठाकरे कोणाला भेटले नाहीत हे खरे आहे. पण त्यावेळची कोरोनाची परिस्थिती तशी होती. पण, उद्धव ठाकरे यांनी याही स्थितीत राज्यात काबिल ये तारीफ काम केले, असे कौतुक त्यांनी केले आहे.

प्रतापगडावरील अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण काढल्यानंतर तेथे शिवस्मारक उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर सुषमा अंधारेंनी अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले? असा सवाल विचारले आहे.

तसंच, बदला घेणे, जातीचे अभिमान बाळगणे, अशी विधाने करून फडणवीस स्वतःसाठी खड्डे तयार करत आहेत. जातीचा माज आणि लाज नसावी कर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करावे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com