मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल : उध्दव ठाकरे
मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल
अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल. तुम्ही साथ-सोबत द्या मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल.
भागवत मशिदीत गेले तर राष्ट्रकार्य आणि आम्ही काँग्रेससोबत गेलो तर...
मोहन भागवत मध्ये मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही. आता मुसलमानांनी सांगितलं की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडतात.
देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण
देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. जेपी नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे आपला देश गुलामगिरीकडे जात आहेत. कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.
तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी
जर कोणी धर्माची मस्ती आमच्यासमोर केली तर त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी.
दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ
शिंदे सरकारचे 100 दिवस होत आहेत. त्यातील 90 दिवस दिल्लीत गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. परंतु, महत्वाचे विषयांवर कोणी बोलत नाही.
पुष्पा म्हणतो झुकेगा नही साला आणि हे म्हणातहेत उठेगा नही
मोठमोठे प्रकल्प गुजरातेत चालत आहेत. आणि हे मिंधे सरकार हे खाली माना घालून बसलेत. पुष्पा म्हणतो झुकेगा नही साला आणि हे म्हणातहेत उठेगा नही साला. एकबार झुकेगा तो उठेगाही नही.
गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय?
मोदींच्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. पाकिस्तान को उसी के भाषा में उत्तर देऊ. पण, पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाल डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पाकव्याप्त काश्मीर जिंकला तर माझे शिवसैमिक डोक्यावर घेऊन नाचतील. पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे?
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत का भाजपाचे घरगुती मंत्री
अमित शहा गृहमंत्री हे देशाचे गृहमंत्री आहेत का भाजपाचे घरगुती मंत्री आहेत. या पक्षात काड्या घाल त्या पक्षात काड्या घालत आहात. मध्येच मुंबईत येतात अणि म्हणतात शिवसेनेला जमीन दाखवा. आम्ही जमिनीवरच माणसे आहोत. आम्हाला जमीन बघायची आहे पाकव्याप्त जमीन हिंमत असेल तर एक फूट जमीन जिंकून दाखवा. ही जमीन आमची मातृभूमी आहे.
मोदींमुळे लोकांना टीव्ही लावायला भीती वाटते
2014 साली मोदी सरकार आले होते. रुपयांचा भाव डॉलरच्या तुलनेत किती होती आज किती आहे. त्यावेळी सुष्मा स्वराज म्हणत होते. मला टीव्ही लावायला भीती वाटते. ज्या देशाचे चलन घसरते तेव्हा देशांची पतसुध्दा घसरते. माझ्या देशाची पत घसरत आहे. आतासुध्दा टीव्ही लावायला लोकांना भीती वाटते मोदी येतील आणि काहीतरी बोलतील.
भाजपाने हिंदुत्व शिंतोडे उडवाताहेत. कोणाच्यातरी थडग्यांवर जाऊन हे थडगे कसे सजवले ते कसे सजवलेत. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या थडग्यावर जाऊन डोके टेकवणारे पक्षांची औलाद. तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकवायचे. पाकिस्ताच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. हिंदुत्व हे खणखणीत असले पाहिजे.
आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुक्करे पाळायची हे चालणार नाही
बोलायची पंचाईत होते आहे कारण मी फडणवीस कायद्याची भाषा चांगली कळली आहे. ते फार सभ्य माणूस आहे. मी टोमणा मारला नाही. जाताना म्हंटले होते. मी पुन्हा येईन. दीड दिवसांचे मुख्यमंत्री होऊन विसर्जन झाले. नंतर उपमुख्यमंत्री म्हणून आले. ते म्हणातात कायद्याच्या चौकटीत बोला. तुम्ही गृहमंत्री आहात. पण, कायदा पाळायचा तर सर्वांनीच पाळावा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुक्करे पाळायची हे चालणार नाही. मिंधे गटातील गोळीबार करत आहेत. चुनचुनके मारके म्हणातहेत ही कायद्याची भाषा आहे. हा जर कायदा असेल तर आम्ही जाळून टाकू. आम्ही काय बोलले तर लगेच स्थानबध्दतेचे आदेश देता.
तुम्ही ठरवणार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पदी राहणार की नाही.
ज्यांना आपण सगळ्यांनी सगळे काही दिले. ज्यांना दिले ते नाराज होऊन गेले. परंतु, ज्यांना दिले नाही ते माझ्यामागे उभे राहीले. हे माझे भाग्य आहे. ही शिवसेना एकट्याची नाही. सर्वांची आहे. तुम्ही ठरवणार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पदी राहणार की नाही.. एक जरी शिवसैमिक म्हंटला गेटआऊट तर मी पायऱ्या उतरु जाईल. पण, हे तुम्ही सांगायचे गद्दारांनी नाही.
50 खोक्यांचा खोकासूर आणि धोकासूर
दरवर्षी परंपरेप्रमाणे रावणदहन होणार आहे. यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आता 50 खोक्यांचा खोकासूर आणि धोकासूर आहे. ज्यावेळेस मी शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो. तेव्हा माझी बोटेसुध्दा हालत नव्हतची. मी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. तेव्हा कटप्पा मी उभा राहू शकणार नाही यासाठी कार्यरत होते. परंतु, माझ्या मागे आई जगदंबेची शक्ती आहे.
तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही
ज्यावेळेस शिवसेनेतील काहींनी गद्दारी केली. गद्दारच म्हणाणार. कारण मंत्रिपदे तुमच्या बुडाला जरी चिकटली तरी कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर आगमन झाले. येताच गुडघ्यावर बसून व्यासपीठाला नमस्कार केला.
मुंबई : शिवसेनेचा आज शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. यावेळी शिवसेनेत फूट पडली असून 40 आमदार फुटले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेला शिवाजी पार्कचं मैदान मिळू नये म्हणूनही बंडखोरांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे शिवसेनेला कोर्टात जावून मैदानाची परवानगी मिळवावी लागली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.