एकनाथ शिंदेंसोबत राहणे आमची मजबुरी; शिंदे समर्थक
उदय चक्रधर | गोंदिया : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू (Surendra Naidu) यांची बुधवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरेंद्र नायडू यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) राहणे ही आमची मजबुरी, असे विधान त्यांनी केले आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू व शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुकेश शिवहरे पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावर बोलताना सुरेंद्र नायडू म्हणाले, शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतरही मी शिवसैनिकच आहे. एकनाथ शिंदे आम्हाला भेटत होते. आमच्या समस्या ऐकत होते. अशा नेत्याची पक्षाला गरज आहे. आम्ही उध्दव ठाकरे यांना सोडलेले नाही. परंतु, आमची एकनाथ शिंदेसोबत राहणे ही आमची मजबुरी आहे. आम्ही त्यांनाही सोडू शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. एक मोठा आमदारांचा गट शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाला. आमदारानंतर अनेक खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. स्थानिक पातळीवरही एकनाथ शिंदे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. या बंडानंतर शिवसेनेकडून सावध पावलं उचलण्यात येत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे.