...म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग; शिवसेनेचा घणाघात
मुंबई : पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. तसेच, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांचे अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले अशा अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.
महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते. शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही.
विरोधकांना इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले. त्याच वेळी महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग हे आधीपासूनच सुरू होते. या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत. ही एक प्रकारे अंधश्रद्धा असली तरी लोकांच्या मनात या अंधश्रद्धा घट्ट रुजत आहेत हे काही बरे नाही. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत. त्यामागे मुख्यमंत्र्यांचे ‘जादूटोणा’ प्रेम आहे असे लोकांना वाटत असेल तर संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या समाजधुरिणांचा तो पराभव ठरेल, असे शिवसेनेने म्हंटले आहे.
मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर गेले की, ते एखादा ज्योतिषी अथवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेले नाही. ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे. कामाख्या देवीला रेडय़ाचा बळी देऊन सरकार आणले ही धारणा फुटलेल्या चाळीस आमदारांची आहे. जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.