'मोदी सरकार महागाईवर ‘कागदोपत्री’ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करतीये'
मुंबई : देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्यांची त्यात होरपळ होत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यावर ‘कागदोपत्री’फुंकर घालून जनतेची दिशाभूल करीत आहे. अर्थात जनता अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.
आपल्या देशात जनता सतत वाढणाऱ्या महागाईने त्रस्त झाली आहे. अन्नधान्याच्या दरात विक्रमी दरवाढ झाल्याने खायचे काय, हा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. तरीही ‘देशातील महागाई कमी झाली’ अशी एक बातमी सरकारी हवाल्याने प्रसिद्ध झाली आहे. आता सरकारीच हवाला तो! त्याचा आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थितीचा कुठे संबंध असतो? पुन्हा सरकारचे हे सगळे हवाले आकडय़ांची जोडतोड करून तयार केलेले असतात. त्यामुळे ‘कागदोपत्री’ फुंकर यापलीकडे त्याला काहीच अर्थ नसतो. सरकार मात्र स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत असते. आताही महागाई काही प्रमाणात कमी झाली, या सरकारी दाव्याबाबत यापेक्षा वेगळे घडलेले नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फळ हेच म्हणायचे का? सरकार म्हणते, चालू वर्षी गव्हाची निर्यात दुप्पट झाली आहे आणि ही मोठी ‘उपलब्धी’ आहे. पण येथे देशातील सर्वसामान्य, गोरगरीबांचे पोट महागाईमुळे खनपटीला लागले आहे त्याचे काय? केंद्र सरकारचे त्यावर काय म्हणणे आहे? जी गोष्ट गहू-ज्वारीची तीच बाजरीची. बाजरीचे भावदेखील सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेले आहेत. शिवाय पावसामुळे काळसर पडलेली कमी प्रतीची बाजरी चढय़ा भावांनी विकत घेण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. पुन्हा अन्नधान्याच्या या भाववाढीचा फायदा ते पिकविणाऱ्या बळीराजाला होत आहे का? तर नेहमीप्रमाणे तो कोरडाच आहे आणि दरवाढीच्या वाहत्या गंगेत साठेबाज, व्यापारी, कॉर्पोरेट कंपन्याच हात धुऊन घेत आहेत.
देशात ज्वारी, बाजरी, गहू, महाग. कडधान्ये आणि डाळीही कडाडल्या आहेत. खाद्यतेलही महागले आहे. रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना. तरीही केंद्र सरकार म्हणत आहे की, ‘देशातील महागाई कमी झाली हो!’एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्यांची त्यात होरपळ होत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यावर ‘कागदोपत्री’ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करीत आहे. अर्थात जनता अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही शिवसेनेने शेवटी म्हंटले आहे.