आदित्य ठाकरे-सुहास कांदेंचा सामना नाशिकमध्ये रंगणार?
Rahul Shewale on Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरून आणि इतर विविध मुद्द्यांवरून आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांच्यावर थेट तोफा डागत आहेत. तेच त्यांनी आता पुढेही सुरू ठेवलं आहे. तसेच काँग्रेस-NCP सोबत जाणं गद्दाराची व्याख्या नाही का? गद्दार कोण आहे याचं उत्तर वरळीकर देतील, अशी घणाघाती टीका बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. ते यावेळी म्हणाले की, आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. आदित्य ठाकरे यांना हरवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न केला होता, असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. (Shiv Sena Crisis Rahul Shewale on Aditya Thackeray)
भाजपची साथ सोडून आदित्य ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले. मग गद्दार कोण आहे हे वरळी विधानसभेतील मतदार निवडणुकीत उत्तर देतील. आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंदच आहे, पण नरेंद्र मोदी यांच्यासमोर दुसरा सक्षम पर्याय सध्या तरी दिसत नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तर सुहास कांदे यांनी जे आरोप केले होते सुरक्षेबाबत त्याला माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीही दुजोरा दिला आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना पोलिसांनी परवानगी दिल्यास आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार, असे वक्तव्य सुहास कांदे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा नवा सस्पेन्स तयार झाला आहे. आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांचा सामना नाशिकमध्ये होणार का? असा सवाल अनेक शिवसैनिकांच्या मनात आहे.