Bhaskar Jadhav | Yogesh jadhav
Bhaskar Jadhav | Yogesh jadhavTeam Lokshahi

शिंदे-ठाकरे गटाचे दोन आमदार एकाच व्यासपीठावर दिसणार?

खेड तालुक्याच्या आमसभेत दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता... आमदार भास्कर जाधव व आमदार योगेश कदम एकत्र दिसणार?
Published by :
Sagar Pradhan
Published on

निसार शेख|रत्नागिरी: शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम व उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुका पंचायत समितीने आयोजित केलेल्या वार्षिक आमसभेच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये खेड तालुका विभागला गेला आहे. त्यामुळे खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व हे दोन आमदार करत आहेत. सन 2019 च्या निवडणुकीत एकत्रित लढलेले आमदार भास्कर जाधव व आमदार योगेश कदम हे शिवसेना फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. आमदार योगेश कदम हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात सहभागी झाले तर आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ठाम राहिले.

शिवसेना फुटीनंतर दोन्ही आमदारांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता एकमेकांवर टीका करणारे हेच दोन आमदार एकाच व्यासपीठावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुका पंचायत समितीची वार्षिक आमसभा ही दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून या आमसभेला दोन्ही आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तालुक्यातील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी व मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राजकीय द्वेष बाजूला ठेवून हे दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. खेड तालुक्याच्या या आमसभेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे या निमित्ताने लक्ष वेधून राहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com