'आम्ही शिंदे समर्थक विखूरलो होतो, आत्ता आमची सत्ता आली'
अमझद खान | कल्याण : मागील दिवसाच्या राजकारणात आम्ही शिंदे समर्थक विखूरलो होतो. आपआपल्या परिने शिंदे यांना पाठिंबा देत होतो. आत्ता आमचे सरकार स्थापन झाले आहे. शहराचा विकास कसा होईल याची रुपरेषा ठरविण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थकांनी दिली आहे. डोंबिवलीत शिंदे समर्थकाची एक बैठक पार पडली.
एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडविल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील शिवसैनिकांच्या बैठका सुरु होत्या. मात्र शिंदे यांची राजकीय भूमिका आणि राजकारणात ते काय निर्णय घेतात. हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांचे तळ्य़ा मळ्य़ात सुरु होते. काही जुन्या शिवसैनिकांकडून ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येत होते. तर, काही शिंदे समर्थकांनी शहरात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले होते. राजकीय परिस्थितीची अंदाज घेत शिवसैनिकांची एक बैठकही तीन दिवसापूर्वी डोंबिवलीत पार पडली. या बैठकीत आपसात वादावादी आणि गैरसमज नको, अशी भूमिका कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केली होती.
राजेश कदम त्यांच्यासह काही शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या सदस्य पदाची राजीनामेही दिले होते. तसेच दिव्यात खासदार शिंदे यांनी एक सभाही घेतली होती. तिला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या सगळ्य़ा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीत जल्लोष साजरा करण्यात आला.
यानंतर डोंबिवलीतील खासदार यांच्या निवासस्थानी आज एक बैठक पार पडली. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर कल्याण-डोंबिवलीचा विकास कसा होईल याची रुपरेषा या बैठकीत ठरवून त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, राजेश कदम, शरद गंभीरराव, नितीन पाटील, रवी पाटील, अजरून पाटील, संतोष चव्हाण, बंडू पाटील, सागर जेधे, सुनिल मालणकर, दिपक भोसले आदी उपस्थि होते.