ठाण्यात शिंदेंचा गड राखला, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी, ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा झाला पराभव
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून ठाणे लोकसभेतून महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार आणि उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षीची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना रंगला होता. याठिकाणी महायूतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के तर महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे राजन विचारे रिंगणात होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान, यावेळी शिंदे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. नरेश म्हस्के यांनी 5 लाख 87 हजार 323 मताधिक्याने विजय मिळवला आहे.