शिंदे का ठाकरे, धनुष्यबाण कुणाचे? शिवसेनेला उद्या दुपारपर्यंतची अंतिम मुदत

शिंदे का ठाकरे, धनुष्यबाण कुणाचे? शिवसेनेला उद्या दुपारपर्यंतची अंतिम मुदत

धनुष्यबाण चिन्हावरुन उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात
Published on

मुंबई : शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यावरुन उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले आहेत. हा संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. पक्ष चिन्हावरुन आज निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी शिंदे- ठाकरे गटाने पक्ष सदस्यात्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. अशातच, शिवसेनेकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आल्याने निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्हाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे टोलावला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपली भूमिका मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली होती. तर, शिंदे गटानेही निवडणूक आयोगाला पत्र लिहीत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असे म्हंटले होते. या पार्श्वभूमीवर आज ही शिंदे गटाकडून शिंदे गटाने तब्बल सात लाख पक्ष सदस्यात्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. यासाठी शिंदे गटाची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.

तर, उद्धव ठाकरे यांच्या गटाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तरी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला. परंतु, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची मागणी फेटाळत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. यामुळे उद्याच धनुष्यबाण कोणाला मिळणार, याबाबतची अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उद्धव गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. या निवडणुकीआधी पक्षचिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे. अथवा पक्षचिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठाविले जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com