हे रिक्षाचालक तुमची काय दशा करतील पहाच; सावंतांना 'त्या' विधानाप्रकरणी शिंदे गटाचा इशारा
मुंबई : महाविकास आघाडी स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का? असा प्रश्न विचारल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. परंतु, यानंतर युटर्न घेत रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नसून माझाच असल्याचा खुलासा अरविंद सावंत यांनी केला होता. यावर आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर येत आहे. अरविंद सावंत तुम्ही संपूर्ण कष्टकरी समाजाचा अपमान केला आहे. तुम्हाला माफी मागणे गरजेचे आहे. हे रिक्षा चालक आता तुमची काय दशा करतील हे पहा, असा इशाराच शिंदे गटाने दिला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले की, अरविंद सावंत यांना खासकरून धन्यवाद देईल. कारणं आम्ही जे म्हणत होतो उद्धव ठाकरे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तऱ्हेने चालतंय. राष्ट्रवादी सांगेल त्या पद्धतीने चालतंय याला आज अरविंद सावंत यांच्या वक्तव्याने पुष्टी मिळाली आहे. आम्ही बाहेर पडताना याचं कारणास्तव बाहेर पडलो. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हातचे बाहुलं झालेले आहे. आणि शिवसेना पूर्ण रसातळाला पोचवण्याचं काम याकडून होतंय आणि काँग्रेस राष्ट्रवादी मोठी होते. आमच्या आमदारांचा तेच म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या विचारसरणीने आणि राष्ट्रवादीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि आमदारांकरीता हे सरकार चालत आहे. त्याला पुष्टी आज अरविंद सावंत यांनी दिलेली आहे.
रिक्षावाला माणूस नाही आहे का? ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात उदरनिर्वाहकरीता रिक्षाव्यवसाय करून केली त्यात त्याची काय चूक आहे का? स्वतःचा पोट भरण्याकरिता कुटुंबियांचे पोट भरण्याकरिता रिक्षा ड्रायव्हिंग सुरू केली. ही त्यांची चूक आहे का? या चोऱ्यामाऱ्या आहेत का? रिक्षावाला माणूस नाही का? त्याला जगण्याच्या अधिकार नाही का? त्याला आमदार-खासदार होण्याचा अधिकार नाही का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे.
अरविंद सावंत तुम्ही संपूर्ण कष्टकरी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो. तुम्हाला मस्ती आली असेल सर्वसामान्य कष्टकरी माणसाला इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही पाहत असाल व त्यालाही हीन दर्जा देत असाल तर अरविंद सावंत तुमची मस्ती आम्हाला उतरावावीच लागेल. अरविंद सावंत यांनी आधी आपली योग्यता तपासावी. एमटीएनएलमध्ये आपण काय होता? त्याआधी आयुष्याची सुरुवात काय केली? सोन्याचा चमचा तुम्ही तोंडात घेऊन जन्माला आलेला नाही आहात. तुम्ही या कष्टकरी समाजाचा अपमान केला आहे तुम्हाला माफी मागणे गरजेचे आहे. हे रिक्षा चालक आता तुमची काय दशा करतील हे पहा, असा इशाराही नरेश म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना दिला आहे.